‘सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक’ हे महात्मा जोतीराव फुले यांनी लिहीलेलं शेवटचं पुस्तक. फुल्यांनी जेव्हा हे पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा त्यांचं अर्ध शरीर अर्धांगवायूमुळे निकामी झालं होतं. त्यामुळे त्यांनी डाव्या हाताने सर्व लिखान केलं. त्यांनी हे पुस्तक जरी पुर्ण केलं तरी त्यांना ते आपल्या हयातीत छापता आलं नाही. त्यांचा मृत्यू १८९० साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी त्यांचा मुलगा यशवंत फुले ह्यांनी हे पुस्तक छापून प्रकाशित केलं.

जीवनामध्ये नितीमत्ता व सत्यवर्तन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फुल्यांच्या मते ह्या गोष्टी ब्राम्हणी धर्मामध्ये अजिबात नाहीत. ब्राम्हणांचे वेद, पुराणे, ब्राम्हणांचं आचरण ह्यामध्ये अजिबात सुसंगती नाही. फुले शुद्रातीशुद्रांना ब्राम्हणी धर्मापासून दूर जाण्यास सांगत होते. पण त्याचवेळी धर्म ही बाब मानवी जीवनात आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. त्यामुळे सत्यशोधक अनुयायांना सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहून एक नवा विचार, नवी नितीमत्ता, नवा धर्म देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी विश्वाची निर्मिती करणारा एक कर्ता आहे असं मत मांडलं व ह्या विश्वनिर्मात्याला निर्मीक म्हटलं.
त्यांनी आपल्या पुस्तकात नामजप, मूर्तीपुजा, पापपुण्य, स्वर्गनरक, नशीब, वेदपुराणे, जन्म, लग्न, मृत्यू, राशिभविष्य अशा विविध मुद्दय़ांवर विवेचन केलं आहे. त्यांनी ज्या ज्या गोष्टी बुद्धीला पटण्यासारख्या नाहीत त्यांचं खंडण केलं आहे. त्यांनी पारलौकिक गोष्टी नाकारुन इहलोकी (म्हणजे आताच्या जन्माशी संबंधित, आताच्या भवतालाशी संबंधित) धर्माचा, आचरणाचा, सत्याचा पुरस्कार केला. फुल्यांचं सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्यशोधकांचं बायबल आहे. प्रत्येक सत्यशोधकाने ते वाचावं, त्याचं मनन-चिंतन करावं व इतर सत्यशोधकांपर्यंत पोहोचवावं. सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
One thought on “महात्मा फुले यांचं ‘सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक’ इथे डाउनलोड करा”